ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विशाखापट्टणम एक्सप्रेसमधून 35 किलो गांजा जप्त

सोलापूर रेल्वे पोलिसांची कामगिरी

सोलापूर,  वृत्तसंस्था 

 

सोलापूर रेल्वे स्थानकात 35 किलो गांजा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशाखापट्टणम येथून मुंबईला जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये सोलापूर रेल्वे पोलिसांनी साडेतीन लाख रुपयांचा 35 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी तरुण-तरुणी वसई येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ पोलिसांना विशाखापट्टणम एक्सप्रेसच्या एसी डब्यातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. विशाखापट्टणम एक्सप्रेस सोलापूर स्थानकावर आल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना तरुण-तरुणीवर संशय आला. त्यांनी दोघांच्या बॅगा तपासल्या असत्या चार बॅगांमधून 35 किलो गांजा जप्त केला आहे. ज्यांची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी तरुण आणि तरुणीला आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले. याप्रकरणी आता सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्हीही तरुण तरुणी वसई येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, अंश प्रेमचंद गुप्ता आणि खुशबू जगदीश ढोणे असे गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तरुणी चौथी पास असल्याचे समजते. तसेच ते दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहितीही समोर येत आहे. पोलिसांनी सांगितले की, सदर तरुण-तरुणीला पैशाचं आमिष दाखवून हैदराबादहून गांजा मुंबईकडे घेऊन जाण्याचे काम देण्यात आले होते. तसेच तरुण-तरुणीला एका ट्रीपसाठी सात ते दहा हजार रुपये मिळत असल्याचीही माहितीही पोलिसांनी दिली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!