मुंबई वृत्तसंस्था
आभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या ‘पुष्पा 2’ सिनेमाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमाने जगभरात आतापर्यंत 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत, असं असताना देखील चित्रपटगृहात चाहत्यांची गर्दी जमताना दिसत आहे.
चित्रपटगृहानंतर सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे 9 जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नेटफ्लिक्सवर अनेक भाषांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळत आहे. पण यावर निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास 40 ते 50 दिवसांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. त्यामुळे सिनेमा कधी ओटीटीवर प्रदर्शित होणार या प्रतीक्षेत चाहते आहेत. ज्यामुळे चाहत्यांना घर बसल्या सिनेमाचा आनंद घेता येईल. दिग्दर्शक सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ सिनेमा अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे. सिनेमातील अभिनेत्याच्या भूमिकेचं आणि सिनेमाच्या कथेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमात अल्लू अर्जुन याच्यासोबत रश्मिका मंदाना, फहद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.