ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात शिवशाही बस पेटवली

सोलापूर, वृत्तसंस्था 

परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या विरोधात आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी दुकाने देखील बंद केली. तसेच आज धुळ्यात १० ते १२ जणांनी एसटी बसवरही दगडफेक केली. त्यानंतर आता सोलापुरात एसटी बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

धुळ्यात दसरा मैदान स्टॉपजवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज सोमवारी दुपारी घडली. या दगडफेकीनंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली होती. तर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. धुळ्यानंतर सोलापुरात एसटी बसवर दगडफेकीची घटना घडली. सोलापुरातही अज्ञात व्यतींनी ३ एसटी बसवर दगडफेक केली. सोलापुरातील डी मार्ट आणि सम्राट चौक परिसरात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. सोलापूरहून तुळापूरला जाणाऱ्या दोन गाड्या आणि सोलापूरहून साताऱ्याला जाणाऱ्या एक गाडीवर दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ही दगडफेक नेमकी कुणी केली, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला त्रास झालेला नाही. सर्व परिस्थिती पूर्ववत झाली असून, वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.

 

एसटी डेपोतील शिवशाही बस अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आली आहे. यासह तीन बसच्या काचा फोडण्यात आल्या. परभणी येथील पोलीस कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणामुळे सोलापूरात पडसाद उमटले. बसवर दगड फेक आणि आंदोलन करण्यात आले. सोलापूरात बंदच्या हाकेला समिश्र प्रतिसाद मिळाला.

 

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेथेच संविधानाची, घटनेची प्रत ठेवण्यात आली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी संध्याकाळी एका माथेफिरू इसमाने या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. ही घटना समोर येताच शहरातील आंबेडकरी अनुयायी संतापले आणि त्यांनी मंगळवारी संध्याकाळीच रेल्वे रोको तसेच रस्ता रोको केला. तर, दुसऱ्या दिवशी बुधवारी आंबेडकर अनुयायी पुन्हा रस्त्यावर आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं. पण त्यानंतर परभणीत जाळपोळ झाली, दगडफेकही करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं. त्यामध्येचे सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. 14 तारखेलाच सोमनाथ यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली , मात्र काल ( रविवार 15 डिसेंबर) त्यांना न्यायालयीन कोठडीत असतानाचा हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांनी केला आहे. पण पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांवर विविध आरोप केले जात असून आंबेडकरी अनुयायींच्या बैठकीत महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यात आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!