ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक.. माजी आमदाराला भावानेच फसवले

तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

सोलापूर वृत्त संस्था 

सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आलीय. शेत जमिनीवर परस्पर नाव नोंदवून मोठ्या भावानेच तहसीलदाराशी संगणमत करून माजी आमदाराची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

महादेव बाबूराव चाकोते, जयशंकर महादेव चाकोते अशी संशयित आरोपींची नावे आहेत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे माजी आमदार विश्‍वनाथ बाबूराव चाकोते यांची कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे गट नं.११२/१ ही शेत जमीन आहे. त्या जमिनीवर विश्वनाथ चाकोते यांच्यासह मोठा भाऊ महादेव चाकोते आणि अन्य चौघांची नावे होती. ती जमीन आमच्या कब्जे वहिवाटेत होती. तरीदेखील मोठा भाऊ महादेव चाकोते याने आम्हाला कोणतीही माहिती न देता आमचे नाव परस्पर कमी करून त्या जमिनीवर स्वत:च्या मुलाचे नाव लावले. त्यासाठी त्याने उत्तर सोलापूरच्या तत्कालीन तहसीलदाराची मदत घेतली, असाही आरोप विश्वनाथ चाकोते यांनी पोलिसांना सांगितले. तसेच नवसमता ट्रान्सपोर्ट या आमच्या वडिलोपार्जित व्यवसायाच्या नावाने हैदराबाद येथील ऑटो नगरमध्ये असलेली जमिनीवरील आमचे नाव वगळून परस्पर त्याने माहिती न देता मूळ कागदपत्रे गहाळ झाल्याचे सांगून नव्याने बनावट कागदपत्रे तयार करून घेतली.

माजी आमदार बाबूराव चाकोते यांचा मी एकटाच वारसदार असल्याचे भासवून २००७ मधील तत्कालीन तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने फसवणूक केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. तसेच ‘तुम्ही कसे जमीन घेता तेच बघतो’ अशी दमदाटी देखील मला करण्यात आल्याचे विश्वनाथ चाकोते यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे तपास करीत आहेत.

भाऊ महादेव चाकोते याने जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर फिर्यादी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी १७ मे २००७ रोजी त्या वाटपासंदर्भातील कागदपत्रांची तहसील कार्यालयाकडे मागणी केली होती. वाटपासंदर्भातील कोणतीही कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी तहसील कार्यालयाने आम्हाला दिल्याचा धक्कादायक खुलासा विश्वनाथ चाकोते यांनी त्यांच्या फिर्यादीतून केला आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही फसवणूक झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!