ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवार गटाचे २ नेते अजित पवारांच्या भेटीला

मुंबई वृत्तसंस्था 

 

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताय. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर मात केली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 41 आमदार निवडून आले. तेच शरद पवार यांच्या पक्षाला फक्त 10 जागांवर समाधान मानाव लागलं. महायुतीमध्ये असलेले अजित पवार आता सत्तेमध्ये आहेत. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला शरद पवार यांच्या पक्षाच्या तुलनेत घवघवीत यश मिळाल्यानंतर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी येऊ लागले आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या 85 व्या वाढदिवशी दिल्लीत सहकुटुंब त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याच शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी शशिकांत शिंदेंसारखे नेते दादांना असेच भेटणार नाहीत असं म्हटलं होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील यांनी नागपूरमध्ये अजित पवार यांची भेट घेतली. रोहित पाटील तासगाव-कवठेमहाकाळमधून विधानसभेची निवडणूक जिंकून पहिल्यांदाच आमदार बनले आहेत.

रोहित पाटील यांच्यानंतर सलील देशमुख अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. सलील देशमुख अनिल देशमुख यांचे पुत्र आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीत काटोलमध्ये सलील देशमुख यांचा पराभव झाला. अनिल देशमुख हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांचा मुलगा सलील देशमुखने अजित पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार अशी चर्चा आहे, त्यावर सलील देशमुख म्हणाले की, ‘मला तसं काही वाटत नाही. चर्चा होत असतात’ ते स्वत: अजित पवारांच्या भेटीला आले, त्यावर म्हणाले की, “हिवाळी अधिवेशन चालू आहे. उपमुख्यमंत्री इथे आहेत. त्यांचं अभिनंदन करायचं होतं. शेतकरी, युवक, विदर्भाचे प्रश्न आहेत. त्यांनी शेतकरी, युवकांचे प्रश्न सोडवले तर चांगली गोष्ट आहे. राजकारणात भेटीगाठी होत असतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले. याचा अर्थ आघाडी तुटली असा होत नाही”

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!