नागपूर : वृत्तसंस्था
राज्यासह केंद्रात महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे तर राज्यात भाजप मोठा पक्ष ठरलेला असतांना आता विरोधक टीकास्त्र सोडत असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे.
प्रदेशाध्यक्ष मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, केवळ सत्ता आली म्हणून सत्तेच्या बाजूने येणाऱ्यांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही. या संदर्भात आमची तीनही पक्षांची चर्चा झाली असून महायुतीला धक्का लागणारे नव्हे तर फायदा असलेले प्रवेश होतील, असे स्पष्ट केले.
नागपूर येथे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. गेले काही दिवस शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येण्याच्या बाबतीत तसेच उद्धव ठाकरे शिवसेना एनडीएत सामील होण्याबाबत चर्चा सुरू आहे. या संदर्भात विचारले असता प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र निर्णय असला तरी महायुतीला धक्का पोहोचेल अशा कोणत्याही मोठ्या नेत्यांचे प्रवेश आपसात चर्चा केल्याशिवाय होऊ नये, असा निर्णय आमच्या बैठकीत झाला आहे. स्थानिक पातळीवर प्रवेश होऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोग निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील सुनावणी २८ रोजी होणार असल्याची माहिती आहे. या सुनावणीनंतर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. सरकार किंबहुना भाजप पक्ष म्हणून सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.