मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात दोन दिवसापूर्वी महायुतीमधील शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केल्यानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली होती मात्र आता त्यांनी स्वतःच्याच विधानावरून घूमजाव केले आहे.
संजय शिरसाट यांनी नुकतेच एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे विधान केले होते. केवळ एका बाजूने प्रयत्न करून चालणार नाही. आमच्या चुका तुम्ही माफ केल्या पाहिजेत. तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. असे झाले तर दोन्ही शिवसेना एकत्र येण्यास हरकत नसावी, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे शिवसेनेसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. पण आता शिरसाट यांनी आपल्या या विधानापासून फारकत घेतली आहे.
संजय शिरसाट सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, ठाकरे गटाने आपली संपूर्ण लाईन चेंज केली आहे. आता हिंदुत्त्व त्यांच्याकडे नावालाही शिल्लक राहिले नाही. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली आहे. त्यांना आता मुसाद सारखे देशद्रोही लागतात. त्यांना आता स्वातंत्र्यवीर सावरकरही चालत नाहीत. ते सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आता ते एवढ्या लांब गेले आहेत की ते पुन्हा एकत्र येणे शक्य नाही.
दुसरीकडे, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येणे सोपे नसल्याचे सांगत असे झाले तर आनंदच असल्याची भावना व्यक्त केली आहे. हा विषय फार जुना आहे. त्याला नव्याने वाचा फोडणे एवढे सोपे नाही. संजय शिरसाट यांना काय वाटले हे मला सांगता येणार नाही. ते तुम्ही त्यांनाच विचारले पाहिजे. पण मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे. मला सर्वकाही गोष्टी माहिती आहे. त्यामु्ळे हे तेवढे सोपे नाही. पण झाले तर आनंदच आहे. चांगली गोष्ट आहे, असे अडसूळ पत्रकारांशी बोलताना म्हणाले.