ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समर्थ नगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची चाचणी यशस्वी

आता एक दिवसाड होणार पाणीपुरवठा, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या अक्कलकोट समर्थ नगर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे काम अखेर पूर्ण झाले असून त्याची सोमवारी सायंकाळी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली. यामुळे समर्थ नगर वासियांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. आता समर्थ नगर अंतर्गत पाईपलाईनची चाचणी बाकी असून तीही दोन दिवसांत सुरू होणार आहे. येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष घरोघरी पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी कुरनूर ते अक्कलकोट स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. अनेक दिवसांपासून याचे काम ही सुरू होते.

हा निधी मंजूर करण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे योगदान मोठे आहे. समर्थनगरमध्ये येणारा भाग हा शहरातलाच आहे.या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना होऊन अनेक वर्ष झाली होती. परंतु पाण्याची समस्या या ठिकाणी मिटली नव्हती. अजूनही १५ ते २० दिवसाड या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर हे काम पूर्णतः जात असून चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने या भागातील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.यावेळी कुरनूर जॅकवेल ते समर्थ नगर पाणी उपसा करून जलशुध्दीकरण केंद्र येथे आणण्यात आले. या पाण्याचे पूजन माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजप शहराध्यक्ष शिवशरण जोजन,माजी सरपंच प्रदीप पाटील,आनंद खजुरगीकर, बाबुराव रामदे,माजी उपसरपंच लालसिंग राठोड,
ग्रा.पं सदस्य मोनेश नरेगल,सतिश खराडे, अभी लोकापुरे,शरण कापसे,विनायक डिगे, सिद्धाराम माळी,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता मतीन बागवान,ग्रामविकास अधिकारी प्रेमदास राठोड, सचिन गिरबोने आदी उपस्थित होते.या योजनेमुळे समर्थनगर येथील पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून एक दिवसाआड पाणी येथील नागरिकांना मिळणार आहे.या योजनेसाठी आमदार कल्याणशेट्टी यांचे सहकार्य लाभले, असे माजी सरपंच पाटील यांनी सांगितले.

एक्सप्रेस फिडरद्वारे विजेची सोय

समर्थ नगर योजना कुरनूर धरणावरून कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी विजेची समस्या निर्माण होऊ नये म्हणून स्वतंत्र एक्सप्रेस फिडर योजनेद्वारे वीज कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे २४ तास पंपिंग होऊन पाणीपुरवठा होणार आहे.विजे अभावी होणारी गैरसोय टाळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!