मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून ठाकरे गटाला गळती लागली असतांना नुकतेच दोन ते तीन दिवसापासून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आज भास्कर जाधव यांनी यावर मौन सोडले आहे. तर विरोधकांना प्रतिउत्तर देखील दिले आहे.
पत्रकार परिषद घेत भास्कर जाधव म्हणाले कि, कुठलेही पद मिळवण्यासाठी मी कधी काम केले नाही. गेले 43 वर्ष मी राजकारणात आहे, मी एवढी पदे उपभोगली आहेत, मी त्याकाळी कधी अशी स्टंटबाजी केली नाही, आता का करेल? बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार हे उद्धव ठाकरेच आहेत. मी जे बोललो ते बाजूला ठेवले गेले आणि जे नाही बोललो त्याला प्रसिद्ध करण्यात आले. मी कधी खोटे बोलत नाही.
भास्कर जाधव म्हणाले, दूसरा खुलासा म्हणजे आपल्या जिल्ह्याचे माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडली. सर्वसाधारण जायचे त्याला जा म्हणण्याचा विचार माझा नाही. हा विचार मांडत असताना आपले सहकारी आपल्या बरोबर राहिले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, ही भूमिका मांडली. पक्ष प्रमुखाने जरूर हे विधान करावे, तो त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे. त्यांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलेल्या असतात तरी सुद्धा सोडून जातात ते. समजाऊन सुद्धा थांबत नसतील तर पक्षप्रमुखांनी निर्णय घेणे योग्य आहे.
भास्कर जाधव यांनी पुढे बोलताना सिंहगडाच्या लढाईचा किस्सा सांगितला. जेव्हा तानाजी मालुसरे धारातीर्थ पडले तेव्हा मावळे सैरावैरा धावू लागले. तेव्हा सूर्याजी मालुसरे पुढे आले आणि म्हणाले अरे पळता कुठे? तुमचे दोर कापून टाकले आहेत मी. तेव्हा मावळे लढले आणि लढाई जिंकली. जे कोणी जाऊ इच्छितात त्यांच्या मनाला उभारी मिळावी म्हणून मी दाखला दिला. आणि सोडून गेलेल्यांना काय अडचणी येऊ शकतात हे मी सांगितले.
भास्कर जाधव म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की कोणालाही कोणाची गरज राहिलेली नाही. त्यामुळे जिथे आहात तिथेच थांबा. पुन्हा एकदा गेलेले वैभव पुन्हा मिळवू, हा मुद्दा मी मांडला. हे मुद्दे नजरेआड झालेले आहेत. तिसरा मुदा मी अत्यंत महत्त्वाचा मी मांडला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आम्हीच आहोत अशी जी काही मंडळी म्हणतात, त्यांना मी उत्तर दिले. वारसदार नेमण्याची किंवा वारसदार ठरवण्याची आपल्या महसूल खात्यात एक पद्धत आहे. त्या पद्धतीनुसार एखादा तलाठी दूसरा कोणी तरी वारसदार एका रात्रीतून नेमतो आणि मूळ वारसदारांना न्याय मागावा लागतो, असे शिवसेनेसोबत झाले आहे. निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खरे वारसदार असताना कोणाला तरी वारसदार नेमला आणि म्हणून आम्ही न्याय न्यायालयात मागत आहोत. पण आम्हाला न्याय मिळत नाही.