ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी ; दर्शनासाठी मंदिरांचे दरवाजे उघडले

अक्कलकोट : अक्कलकोट सध्या कोरोनाचे रूग्ण आटोक्यात आले असले तरी डिसेंबर महिन्यात रूग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली होती. त्या पार्श्वबभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार 24 डिसेंबरपासून अक्कशलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र नूतन वर्षाच्यानिमित्ताने शुक्रवार 1 जानेवारीच्या पहाटेपासून मंदिर खुले झाल्याने भक्तांसाठी स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 9 महिन्यांपासून बंद असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर दिवाळीच्या मुहूर्तावर उघडण्यात आले होते. त्यानंतर नाताळ व शासकीय सुट्टया, दत्त जयंती उत्सव, थर्टी फस्ट, व नूतन वर्षाचे स्वागत या पाश्वभूमीवर वटवृक्ष मंदीरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली असती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग बळावू नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 24 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 अखेर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

 

शिवाय या कालावधीत भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेशासाठी मनाई करण्यात आली होती. या आदेशास अनुसरून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्यासोबत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांची 27 डिसेंबर रोजी चर्चा झाली. कोरोना संसर्ग मंदिरात होवू नये याकरिता मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था, मंदिर परिसरात सॅनिटायझर पुरवठा, मास्क वापरण्याबाबत मार्गदर्शन इत्यादी व्यवस्था दिवाळीपासून मंदिर उघडल्यानंतर करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शासनाच्या नियमांची अंमलबजावणी यापुढेही कायम राहणार असल्याचे मंदिर समितीच्यावतीने सांगण्यात आले. यामुळे नूतन वर्षाच्या मुहूर्तावर वटवृक्ष मंदिर भाविकांना स्वामी दर्शनाकरीता खुले करण्यात यावे अशी विनंती केली गेली. या विनंतीबाबत विचार विनिमय करून जिल्हाधिकारी यांनी 1 जानेवारी 2021 रोजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर उघडण्याचे नवीन आदेश पारित केले. त्यामुळे 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांना स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अन्नछत्रासही प्रारंभ

शासनाच्या आदेशानुसार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे 1 जानेवारी 2021 पासून सुरु होणार असल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली. दरम्यान, न्यासातील अन्नदानाची सेवा (महाप्रसाद) आणि निवासी व्यवस्था कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद होते. हा निर्णय शासनाने श्री दत्त जयंतीनिमित्त घेतला होता. शासनाने 1 जानेवारी 2021 पासून अन्नछत्र सुरु करण्याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!