ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील लाडक्या बहिणी संकटात : ९ लाख महिला योजनेतून बाहेर !

मुंबई : वृत्तसंस्था

देशातील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या दीड हजार रुपये महिना देण्यात आला. त्यामुळे राज्य सरकारची लोकप्रियता वाढली आणि पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. आता या योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांची नावे कमी केली जात आहेत. या कमी होणाऱ्या महिलांची संख्या आता नऊ लाख होणार आहे. यापूर्वी पाच लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती. यात आता नव्याने चार लाख महिलांची भर पडणार आहे.

माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना दरमहा पैसे मिळत आहेत त्याच महिलांच्या नावावर नमो शेतकरी सन्मान योजनेचा देखील पैसा मिळत आहे. तसेच काही महिलांना दिव्यांग विभागातून देखील लाभ मिळत आहे. अशा महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येत आहेत. सोबतच निकषात न बसणाऱ्या अनेक महिला देखील आहेत. त्यांनी स्वतः आपले नाव कमी करून घेण्यास सुरुवात केली आहे. या सर्व कारणांमुळे आता लाडकी बहिण योजनेत अनेक महिलांची नावे कमी होत आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून सुमारे साडेसोळा लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठवण्यात येत आहेत. मात्र आता यातील महिलांची नावे कमी होताना दिसत आहे. काही महिलांचे बँक खाते आणि नावात तफावत आढळून आली आहे. तर काही महिला निकषात बसत नसताना देखील त्यांनी अर्ज दाखल केले होते. अशा महिलांचे आधार कार्ड आता योजनेशी लिंक नसेल तर त्यांना या योजनेतून बाद केले जात आहे. त्यातच आता चार लाख महिलांची आणखी भर पडत आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरील बोजा देखील कमी होणार आहे.

लाडकी बहिण योजनेतून महिलांची नावे कमी करण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षाकडून टीका होत आहे. विजय वडेट्टीवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांनी देखील या निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सरकारच्या वतीने आता लाडक्या बहिणी या लाडक्या राहिल्या नाही का? असा प्रश्न विरोधी पक्षाच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!