ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खळबळजनक : वाळूचे डंपर पत्र्याच्या शेडवर रिकामे केल्याने पाच जणांचा दबून मृत्यू !

जालना : वृत्तसंस्था

राज्यात नेहमीच अवैध वाळू वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले असतांना आता दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला. रात्री अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मजूर झोपलेल्या पत्र्याच्या समोर वाळू रिकामी केल्याने वाळू खाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रोडवर पुलाचे काम चालू होते या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर येथे गुत्तेदाराकडे पूल उभारणीचे काम करत होते. पत्र्याचे शेड करून सर्व मजूर पुलाजवळच राहत होते. दरम्यान रात्री सर्व मजूर जेवण करून झोपले होते. एकूण सात जण या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. या पुलाच्या कामासाठी रात्रीला साडेतीन वाजता वाळू घेऊन एक टिप्पर आला. अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याने घाई गडबडीत अंधारामध्ये त्यांनी पत्र्याच्या शेडवरच वाळू उतरवली यात वाळूखाली दबून 5 जणांचा मृत्यू झाला.

गणेश काशिनाथ धनवई (वय 40 रा.गोळेगाव) भूषण गणेश धनवई,(वय 16 रा गोळेगाव) सुनील समाधान सपकाळ (वय 20 रा. पद्मावती)यांच्यासह अन्य दोघांचा मृत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे. दरम्यान घटनास्थळी तातडीने पोलिस उपस्थित झाले. सदर टिप्पर चालक जाफराबाद तालुक्यातला असून तो रात्री घटना घडतात फरार झाला आहे. दरम्यान घटनेच्या शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी मदत करून एका मुलीचे प्राण वाचवले. सकाळी झोपेत असताना गणेश धनवई व भूषण धनवई या बापलेकांवर काळाने घाला घातला विशेष म्हणजे थंडी असल्याने मयतांच्या अंगावर रग होती त्यावर रेतीच्या जोराने पत्र्याचे शेड पडले व पत्र्यावर रेती पडली यामुळे सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये एक तेरा वर्षीय मुलगी ही दबली होती परंतु गावातील ग्रामस्थांसह शेजारी राहणाऱ्या मजुरांनी मदत करून मुलीचे प्राण वाचवले.

जाफराबाद तालुक्यांमध्ये पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळेस अवैधरित्या वाळू उपसा केला जातो या वाळूची वाहतूक सुसाट वेगाने तालुक्यासह विदर्भातील विविध भागांमध्ये होत असते. यामुळे रात्रीच्या वाळू वाहतुकीस महसूल व पोलिस प्रशासनाचे अभय मिळत असल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. रात्रभर तालुक्यातून वाळू वाहतुकीचे टिप्पर सुरू असतात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाच जणांचा रेतीखाली दबून मृत्यू झाल्याने घटनास्थळी सकाळीच महिलांचा आक्रोश दिसून आला. मयतांचे नातेवाईक सकाळीच घटनास्थळी आले यामध्ये महिलांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!