मिरज : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना आता रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे भरधाव कारने दुचाकीला ठोकल्याने तिघे जागीच ठार झाले. यामध्ये पती-पत्नीसह एक वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. सुरेश शिंदे, संजना शिंदे व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर शिंदे अशी त्यांची नावे आहेत.
शिंदे दाम्पत्य हे धाराशिव जिल्ह्यातील असून ते ऊसतोड कामगार आहेत. सांगलीतील गळीत हंगाम संपवून दांपत्य आपल्या मुलासह दुचाकीवरून धाराशिवकडे निघाले होते. यावेळी मध्यरात्री भरधाव कारने त्यांना ठोकल्याने तिघे गंभीर जखमी झाले. अपघातात सर्वजण गंभीर जखमी झाल्याने एक वर्षाच्या चिमुकल्यासह दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.