अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेतून ७ हजार ३२६ घरकुलांना मंजुरी मिळाली असून ही घरे एक वर्षात पूर्ण होतील.यासाठी पूर्वीसारखे आता पंचायत समितीला हेलपाटे मारायची गरज नाही. सर्व कारभार हा पारदर्शक असून थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होत आहे. मोदी सरकारचा हा परिणाम आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.शनिवारी, अक्कलकोट येथील पंचायत समिती सभागृहात आमदार कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा ०२ अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्रांचे वितरण तसेच १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण पुणे येथे करण्यात आले.
याच अनुषंगाने अक्कलकोट पंचायत समिती येथून या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होत आमदार कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांशी संवाद साधून घरकुल मंजुरी पत्रांचे वाटप केले.२०२४ – २५ या वर्षी ७ हजार ६१६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.त्यापैकी ७ हजार ३२६ मंजुरी मिळाली.मंजुरीचे प्रमाण हे ९६.१९ टक्के इतके आहे.उर्वरित २९० लाभार्थी किरकोळ बाबींमुळे शिल्लक आहेत. राहिलेले अनेक लाभार्थी मयत आहेत.काही जणांचे आधार कार्ड अपडेट नाहीत म्हणून ते मंजूर नाहीत.त्यासंदर्भात ही प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. मंजूर झालेले घरकुले तात्काळ बांधून घ्यावीत आणि याबाबतीत अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे,अशी सूचना त्यांनी केली. यासंदर्भात बोलताना गटविकास अधिकारी शंकर कवितके म्हणाले, आजच्या कार्यक्रमात ५ हजार ८६२ पैकी ५ हजार ५८३ जणांना पहिला हप्ता १५ हजार रुपये प्रमाणे खात्यावर वर्ग केले.उर्वरित २७९ जणांना पहिला हप्ता लवकरच मिळणार आहे.ज्या बँकेला आधार लिंक आहे त्या खात्यात जमा होईल. ज्यांचे आधार बँकेची लिंक नाहीत अशा लाभार्थ्यांना ही रक्कम जमा होण्यास अडचण आहे. त्याचीही पूर्तता लवकरच करण्यात येईल, असेही ते म्हणाले. सरकारच्या आणि प्रशासनाच्या घरकुल मंजुरीच्या आणि रक्कम मिळण्याच्या तत्परतेबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एम. के. शेगर, गटविकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते, खय्युम पिरजादे,दयानंद परिचारक, युसूफ पठाण,संजय पाटील,सिद्धय्या मठ, अमर दोडमनी,आशा कदम,घरकुल अभियंता शकील पिंजारे यांच्यासह अनेक लाभार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.
घरकुल अनुदानाची रक्कम वाढविली
पूर्वी शासनाकडून १ लाख ५८ हजार रुपये मिळत होते.आता २ लाख १० हजार रुपये मिळणार आहेत. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात केली. पूर्वीच्या अनुदानात ५० हजार रुपये वाढवून मिळणार आहेत.एकूण चार टप्पे
करण्यात येणार आहेत.
घरकुल मंजुरीबाबत जिल्हयात अव्वल
घरकुलाबाबतीत यावर्षी अक्कलकोट तालुक्याला सर्वाधिक उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९७ उद्दिष्ट हे अक्कलकोट तालुक्यातील पूर्ण केले. घरकुल मंजुरीच्या बाबतीत तालुका अव्वल ठरला आहे.आता ही सर्व घरकुले लवकरात लवकर पूर्ण करून याबाबतीतही आम्ही नंबर वन होऊ. यासाठी लाभार्थ्यांनी सहकार्य करावे.
शंकर कवीतके, गटविकास अधिकारी