पुणे – पुणे महापालिकेच्या हद्दीतील शाळा आजपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या दिवशी महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा 66 शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. शाळा सुरु करण्यासाठी पालकांची लेखी संमती असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
राज्य सरकारने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. राज्यभरातील शाळा सुरू झाल्या, पण पुण्यातील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी दोन वेळा शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागला. मात्र, तिसऱ्या वेळेस महापालिका प्रशासनाने 4 जानेवारीपासून शहरातील शाळा सुरू होणार असल्याचे सांगितले.
शाळा सुरू करताना पालकांचे संमतीपत्र, शाळांनी केलेल्या उपाययोजना हा महत्वाचा भाग होता. महापालिकेच्या शाळेसह खासगी शाळांमधून पालकांकडून संमतीपत्र घेण्याचे काम अजूनही सुरूच आहे. शाळांमध्ये सॅनिटायझेशन, थर्मल गन, ऑक्सिमिटर, वर्गामधील बसण्याची व्यवस्था याचे नियोजन झाले आहे. पण शिक्षकांच्या करोनाच तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नसल्याने शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या पथकामार्फत शाळांची तपासणी सुरू आहे. रविवारी (दि. 3) दुपारपर्यंत शहरातील 529 पैकी 232 शाळांची तपासणी पूर्ण झाली आहे.
यामध्ये महापालिकेच्या 44 आणि खासगी 188 शाळा आहेत. त्यापैकी महापालिकेच्या 100 टक्के आणि 22 खासगी शाळांना सोमवारपासून वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सांगितले.