मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक व्हिडीओ समोर आले असतांना आता बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह काहीजणांना अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता लवकरच मुंडे यांची आमदारकी देखील जाणार असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.
मी मागे म्हटले होते त्यांचे मंत्रिपद जाणार आणि ते खरेही ठरले. आता येत्या सहा महिन्यात धनंजय मुंडे यांची आमदारकीही जाईल, असं भाकीतच करूणा मुंडे यांनी केले आहे. करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज सुनावणी होणार आहे. त्याआधी त्यांनी मुंडेंवर निशाणा साधला.
करूणा मुंडे यांनी याआधी धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचा राजीनामा कधी देणार याची तारीखच सांगितली होती. ही तारीख त्यावेळी हुकली असली तरीही दुसऱ्या दिवशी मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी तारीख चुकली असली तरी राजीनाम्याची बातमी मात्र खरी ठरली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा करूणा मुंडे कधी यांनी धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार असे भाकीत केले आहे.
करूणा मुंडे म्हणाल्या की, निवडणुकीत मुंडेंनी 200 बूथ कॅप्चर केले. निवडणुकीत माझे नाव टाकले नाही, आमच्या केसचा संदर्भ दिला नाही. 2014 पासून माझे नाव आणि माझ्या मुलाबाळांचे नाव टाकले नाही. यावर निवडणूक अधिकारी, कलेक्टर कोणीच ऑब्जेक्शन घेतले नाही. 2024 मध्ये माझ्या मुलांचे नाव टाकले आणि माझे नाव गायब केले. मुंडेंना सहा महिन्यांची शिक्षा होईल. मी बोलले होते की, मंत्रिपद जाणार तर ते गेले. आता मी सांगते की, आमदारकीही जाणार आहे. सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल, असा दावा त्यांनी केला आहे.