मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या संजय केनेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर संदीप जोशी आणि दादाराव केचे यांनाही संधी देण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने 3 जणांचे नाव जाहीर केले आहे. आता 2 जागांसाठी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. मागील 33 वर्षांपासून निष्ठेने काम केल्याने पक्षाने मोठी संधी दिली, असे संजय केनेकर यांनी म्हटले आहे.
20 मार्च ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर 27 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत निवडणूक होईल. त्यानंतर सायंकाळी 5 वा. लगेचच मतमोजणीला सुरुवात होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर होतील. आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांचे नाव भाजपकडून विधानपरिषद करिता आज जाहीर करण्यात आले. केचे यांची विधानसभेत उमेदवारी कापून सुमित वानखेडे यांना देण्यात आली होती. त्यामुळे केचे नाराज होते. उमेदवारी नाकारल्यामुळे केचे बंडाच्या तयारीत होते. आर्वी मतदारसंघातून तिकीट नाकारलेल्या दादाराव केचे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यास नक्की संधी देणार असे सांगण्यात आले होते. आता त्यांना संधी देण्यात आली आहे.
संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. 2021 मध्ये पोटनिवडणुकीत संजसय केनेकर यांना संधी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांना आमदार होता आले नाही. यानंतर आता 4 वर्षांने त्यांना संधी देण्यात आली आहे. तर संदीप जोशी हे नागपूरमधून येतात. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
राजेश विटेकर विधानसभेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. अजितदादांच्या राष्ट्रावादी काँग्रेसकडूनही विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.त्यामुळे अजित पवार आता विधान परिषदेवर कोणत्या नेत्याला संधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.