नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या महिन्यापासून ९०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती १.७४ टक्क्यांनी वाढणार आहेत. याचा थेट परिणाम मधुमेह, हृदयरोग, संसर्गजन्य आजार आणि वेदनाशामक औषधे घेणाऱ्या लाखो रुग्णांवर होणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटीने जारी केलेल्या निवेदनानुसार, मागील वर्षाच्या घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे या किंमती वाढवल्या जात आहेत. २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये WPI मध्ये १.७४ टक्के वाढ झाल्याने औषध कंपन्यांना अनुसूचित औषधांच्या किरकोळ किंमती वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विविध प्रकारच्या संसर्गविरोधी, हृदयविकार, मधुमेह, वेदनाशामक आणि इतर अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. त्यामध्ये काही प्रमुख औषधांचे दर पुढीलप्रमाणे असतीलः
अॅन्टीबायोटिक्स: अजिथ्रोमायसिन (२५०mg) – ₹११.८७ प्रति टॅब्लेट, (५००mg) – ₹२३.९८
मलेरियावरील औषध: हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन (२००mg) – ₹६.४७, (४००mg) – ₹१४.०४
अँटीव्हायरल: एसायक्लोव्हिर (२००mg) – ₹७.७४, (४००mg) – ₹१३.९०
वेदनाशामक औषधे: डायक्लोफेनाक – ₹२.०९ प्रति टॅब्लेट, इबुप्रोफेन (२००mg) – ₹०.७२, (४००mg) – ₹१.२२
या किंमतवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्यसेवा अधिक खर्चिक होणार आहे. सरकारने अत्यावश्यक औषधांच्या किमती नियंत्रित ठेवण्याची गरज असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा, गरीब आणि गरजू रुग्णांसाठी उपचार घेणे कठीण होईल.