सोलापूर : वृत्तसंस्था
अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना सोलापुर येथून समोर आली आहे. स्कूल बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (दि. ८) घडली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी बसचालक, वाहक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग तीपण्णा राठोड (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. तो शाळेतून घरी जाताना बसमधून खाली पडला. त्यानंतर त्याच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा बंद करणे गरजेचे असताना देखील गाडीतील वाहकाने काळजी घेतली नसल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. याप्रकरणी बसचालक, वाहक आणि शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.