ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धोपट मार्गा सोडू नको

 

मराठी माणसाच्या आदर्श जीवनाच्या कल्पनेत धोपट मार्गाने चालणे हे आवश्यक मानलेले आहे. निदान पैसे कमावण्यासाठी जो माणूस मळलेली वाट सोडून काही नवा प्रयास करायला लागतो त्याला मराठीत उचापती करणे असे म्हणतात. अशी एखादी उचापत करताना कोणी धडपडला तर त्याला धीर देण्याऐवजी टोचून बोलण्यातच मराठी माणसांचे व्यवहारी ज्ञान सामावलेले असतेे. म्हणून उचापती करणारे उद्योगी लोक कायम टिंंगलीचा विषय झालेले असतात.मराठी मानसिकतेत जादा पैसा कमावणे हेच मुळात निषिद्ध मानलेले असते. आपण नाकासमोर चालावे आणि अनंते ठेविले तैसेचि रहावे यात जीवनाची सार्थकता मानलेली आहे. त्यामुळे गरिबीचे कौतुक आणि श्रीमंतीचा दुस्वास मराठी भाषेत अनेक वाक्यप्रचार आणि म्हणींतून टपकताना दिसतो. ‘राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या’ ही आपली आवडती कविता असते.श्रीमंतीपेक्षा गरिबीच बरी असे आपण मानतो. त्यामुळे ‘लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी’ ही आपले जीवनाचे ध्येय व्यक्त करणारी म्हण असते. तिच्यातून गरिबी धट्टीकट्टी असते आणि श्रीमंती ही लुळीपांगळी असते हे मत आपण मुलांच्या मनावर लहानपणापासून ठसवत असतो. मग जी श्रीमंती लुळीपांगळी असते तिच्या नादी लागायचे कशाला ? असा विचार ती मुले करायला लागतात. खरे तर गरिबीच लुळीपांगळी असते आणि श्रीमंती धट्टीकट्टी असते.आपले उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ घालायचा असेल तर काटकसरीने, साधेपणाने आणि शक्यतो गरजा कमी करून जगले पाहिजे अशी शिकवण मराठी मुलांना लहान वयातच दिलेली असते. ती देताना ‘अंथरुण पाहून पाय पसरावे’ असे आवर्जुन त्याच्या मनावर बिंबवले जाते. मात्र आपण चांगले राहिले पाहिजे, शानशौकीत जगले पाहिजे आणि चांगले चुंगले खाल्ले पाहिजे. वाटल्यास ते आपल्याला परवडत नसेल तर परवडावे म्हणून उत्पन्नाचे नवे मार्ग शोधले पाहिजेत असे त्या मुलांना कधी वाटतच नाही. ती मुले कोठे तरी खर्डेघाशी करण्यातच धन्यता मानतात.ही प्रवृत्ती एवढी वाढते की आपण चार पैसे चांगले कमावणार्‍या माणसाचे कौतुक करण्याऐवजी त्याची बदनामी करण्यातच आपली शक्ती खर्च करतो. तो फार बदमाष आहे. चमचेगिरी करून पैसा कमावतो. चोरीचा माल विकतो तेव्हा त्याच्या कमाईला काही अर्थ नाही. असे पैसे कमावण्यापेक्षा आपण गरिबीत किती चांगले आहोत हे आपण कौतुकाने सांगत असतो. यातून आपली श्रीमंतीविषयीची घृणाच स्पष्ट होत असते. असे असेल तर या समाजात राहून कोणाला उद्योगधंदे करून श्रीमंत होण्याची इच्छा होईल ?

– अरविंद जोशी,सोलापूर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!