ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अरे बापरे…’आयफेल टॉवर’ पेक्षाही मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय

नवी दिल्ली : नवं वर्ष सुरू होऊन आठवडा न होतो तोवर पृथ्वीसाठी एक नवं संकट निर्माण झालं आहे. आयफेल टॉवर इतका मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा उल्कापिंड ६ जानेवारी रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यातील दोन उल्कांचा आकार तर पॅरिसमधील सुप्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’पेक्षाही मोठा आहे. आयफेल टॉवरच्या उंचीपेक्षा 0.83 पटीने जास्त वाढलेला 2021 CO247 नामक एक मोठा लघुग्रह पृथ्वीवरून 7.4 दशलक्ष किलोमीटरच्या अंतरावरून जाईल.

पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या सहा उल्कांपैकी एक २०२१ एसी हे उल्कापिंड आज सकाळीच पृथ्वी जवळून गेले आहे. या उल्कापिंडाचा सरासरी व्यास ७३.५ मीटर इतका होता, तर त्याचा वेग तब्बल ५०,६५२ किमी प्रतितास इतका प्रचंड होता. २०१६ सीओ २४७ नावेच्या दुसऱ्या उल्कापिंडाचा सरासरी व्यास हा तब्बल ३४० मीटर इतका मोठा आहे. तर सरासरी वेग ६०,२२८ किमी इतका आहे. पृथ्वीपासून ७.४ दशलक्ष किमी अंतरावरुन हे उल्कापिंड गेले आहेत.

सहा उल्कापिंडामध्ये सर्वात लहान असलेल्या २०२१ एजे या उल्कापिंडाचा व्यास २० मीटर इतका आहे. आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास हे उल्कापिंड पृथ्वीजवळून जाईल. त्यापाठोपाठ ३२ मीटर व्यासाचे २०१८ केपी१ हे उल्कापिंड जाणार आहे. २०२१ एयू हे उल्कापिंड तर पृथ्वीपासून सर्वात जवळ १.४२ दशलक्ष किमी अंतरावरुन जाणार आहे. या उल्कापिंडाचा व्यास जवळपास ६० मीटर इतका आहे.

भारतीय वेळेनुसार आज मध्यरात्री २.३० वाजता सर्वात शेवटचे सहावे उल्कापिंड पृथ्वीजवळून जाईल. २००८ एएफ४ या उल्कापिंडचा सरासरी व्यास तब्बल ५०० मीटर इतका आहे. महत्वाची बाब अशी की हे भव्य उल्कापिंड पृथ्वीवर आदळले तर सर्वात मोठा अणुबॉम्ब जितकं नुकसान करू शकतो तितकंच नुकसान यातून होऊ शकतं. हे उल्कापिंड तब्बल ३९,६५४ किमी प्रतितास वेगाने प्रवास करत आहे. सुदैवाने हे उल्कापिंड पृथ्वीपासून १५ दशलक्ष किमी अंतरावरुन जाणार असून पृथ्वीला याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!