मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील भाविकांनी लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. मात्र लालबागचा राजा गणेश मूर्तीचं विसर्जन कित्येक तास उलटूनही झालेलं नव्हते. समुद्राला आलेल्या भरतीमुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबणीवर पडले होते. ६ सप्टेंबरला सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक सुरु झाली. तर ३३ तासांनंतर अखेर ७ सप्टेंबर रात्री ९ च्या सुमारास लालबागच्या राजाचं विसर्जन पूर्ण झाले.
भरती-आहोटीच्यानंतर ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी लालबाग राजाचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले. दरम्यान यंदा लालबागच्या राजाचे विसर्जन निर्धारित वेळेत न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
परंतु, अनेक अडचणींनंतर अखेर संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास मूर्ती तराफ्यावर आरुढ करण्यात आली. रात्री ८ वाजता लालबागच्या राजाची उत्तर आरती संपन्न झाली आणि रात्री ९ वाजून १० मिनिटांनी लालबागच्या राजाचे विसर्जन ३३ तासांनंतर पूर्ण झाले.
तब्बल २२ तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर रविवारी सकाळी 8 वाजता लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला होता. त्यानंतर आरती होऊन दीड-दोन तासात गणपतीचे विसर्जन होणे अपेक्षित होते. मात्र, तोपर्यंत समुद्राला मोठी भरती आली. त्यामुळे लालबागचा राजाचा पाट जड झाला. हा पाट स्वयंचलित तराफ्यावर चढत नसल्यामुळे लालबागचा राजाचे विसर्जन लांबले. ओहटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतला जातो आणि भरतीच्यावेळी त्याचे विसर्जन केले जाते. मिरवणूक चौपाटीवर पोहचण्यास १० ते १५ मिनिटं उशिर झाला आणि भरती सुरू झाली. यामुळे दिवसभर विसर्जनासाठी वाट पाहावी लागली.
दरम्यान, लालबाग राजाच्या विसर्जनाचा मान कोळी बांधवांचा असतो. मात्र, यंदा लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने गुजरातहून हायटेक ऑटोमेटेड तराफा आणला होता. यंदा नव्याने तयार करण्यात आलेल्या तराफ्याचा आकार दुप्पट होता. जुन्यापेक्षा नवीन तराफा तीनपट मोठा असल्याने सहजपणे विसर्जन सोहळा पार पडेल, असा अंदाज मंडळाला होता. मात्र, भरतीमुळे तराफ्यावर लालबागच्या राजाची मूर्ती चढवणे शक्य झाले नाही. त्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले. अखेर खग्रास चंद्रग्रहण सुरू होण्यास काही मिनिटे शिल्लक असताना कोळी बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ असे म्हणत भाविकांनी बाप्पाला निरोप दिला.