---Advertisement---

धक्कादायक : पत्रकार पुत्राच्या निर्घृण हत्येने बीड हादरले !

By team
On: September 26, 2025 2:49 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीची चर्चा सुरु असताना आता बीड शहरातील गुन्हेगारी विश्वाला हादरवणारी मोठी घटना गुरुवारी रात्री घडली. माने कॉम्प्लेक्ससारख्या कायम गजबजलेल्या परिसरात यश देवेंद्र ढाका (वय 22) या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यश हा स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा असून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी धारदार चाकूने त्याच्या छातीत वार करण्यात आला. या वारांमुळे तो रक्तबंबाळ झाला आणि गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे बीड शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या खुनामागील कारण अधिक धक्कादायक आहे. यश आणि त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात महिनाभरापूर्वी वाढदिवस साजरा करताना वाद झाला होता. त्या वादाचे रूपांतर हळूहळू वैरात झाले. गुरुवारी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच सूरजने चाकू काढून थेट यशवर प्राणघातक हल्ला केला. छातीत आरपार झालेले दोन वार यशसाठी घातक ठरले. एका क्षुल्लक कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेला हा जीवघेणा संघर्ष शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा माने कॉम्प्लेक्स परिसरात दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. प्राथमिक तपासात सूरज काटे हा आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या खुनात इतरांचा सहभाग आहे का? हे शोधण्यासाठी पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून नंतर तो कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

यश हा बीडमध्ये चांगली ओळख असलेल्या पत्रकाराचा मुलगा असल्याने या हत्येने अधिक खळबळ उडवली आहे. एका पत्रकार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पत्रकार बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गर्दीच्या भागात, शेकडो लोकांच्या उपस्थितीत अशी हत्या घडणे ही धक्कादायक बाब मानली जात आहे. या प्रकरणामुळे बीड शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!