ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात भाजपने राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का : दोन माजी आमदारांना लावले गळाला

सोलापूर : वृत्तसंस्था

राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक ठिकाणी मोठ मोठे धक्के देत असताना आता सोलापुरात ऑपरेशन लोट्स राबवले. सोलापूरमध्ये भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गळाला दोन माजी आमदार लागले. राजन पाटील आणि यशवंत माने या दोन माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केला. लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला. माजी आमदार बबनदादा शिंदेंचे पुत्रही भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. भाजप आगामी निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे. तर स्थानिक राष्ट्रवादीचे नेते आता भाजपसोबत महायुती धर्माचं कसं पालनं करणार असा सवाल विचारला जात आहे.

यावेळी राजन पाटील आणि यशवंत माने या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीतील गटबाजीवर चांगलेच तोंडसुख घेतले. त्यामुळे जाता जाता त्यांनी पक्षातील वाद चव्हाट्यावर आणल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी पक्षात आता शिस्त राहिली नाही, म्हणून पक्ष सोडला अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. भाजप आता सोलापूरमय झाला आहे. भाजप सोलापुरात एकटं लढलं तर कमळ फुलेल असा दावा त्यांनी केला. जर महायुतीत लढलो तर बाकी लोकांना फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मतदार संघातील कुरघोडीमुळे कंटाळलो होतो. आमदार असताना चांगली वागणूक पण आमदार नसताना वेगळी वागणूक मिळत असल्याचा आरोप माजी आमदार यशवंत माने यांनी केला. मतदार संघातील विकासासाठी निधी सुद्धा मिळत नव्हता म्हणून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निणर्य घेतल्याची बाजू त्यांनी मांडली. तर या धक्कातंत्रावर मंत्री जयकुमार गोरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. आम्ही कोणाला धक्का दिला नाही, असे ते म्हणाले. महायुतीत कोणतेही वितुष्ट येणार नाही. ज्या लोकांना आमच्याकडे यायचं आहे. ते लोक येत आहेत. स्वतःहून येणाऱ्या लोकांना आम्ही घेत आहोत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती बाबत वरिष्ठ निर्णय घेतील असे गोरे यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!