---Advertisement---

भोईर खून प्रकरणाला नवे वळण : प्रियकराच्या मदतीने केला पत्नीने खून !

By team
On: October 30, 2025 4:23 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यभरात चिंचवड भागात घडलेल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला पतीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पत्नीने हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, या प्रकरणात धक्कादायक वळण आलं असून, आरोपी पत्नी चैताली भोईरने आपल्या प्रियकराच्या मदतीनेच पतीचा खून केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी प्रियकर सिद्धार्थ पवारला अटक केली असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना 1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने केवळ चिंचवड नव्हे, तर संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.

24 ऑक्टोबर रोजी शुक्रवारी पहाटे नकुल भोईर यांची हत्या करण्यात आली होती. ते चिंचवडमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते. समाजातील दुर्बल घटकांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. नकुल यांच्या मृतदेहावरून पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता, गळा आवळून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला पोलिसांना ही कौटुंबिक वादातून घडलेली घटना असल्याचा संशय होता. चौकशीत पत्नी चैताली भोईर (वय 28) हिने स्वतःच गुन्ह्याची कबुली दिल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. मात्र, तपास जसजसा पुढे सरकला, तसतसे या हत्येमागे आणखी एक व्यक्ती असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आणि प्रकरणाने नवा कलाटणी घेतली.

तपासादरम्यान पोलिसांना समजले की, चैतालीचा सिद्धार्थ पवार नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होता. नकुल भोईर यांना या संबंधाची माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. नकुल हे पत्नीला मद्यपान न करण्यास, काही मित्रमैत्रिणींपासून दूर राहण्यास सांगत असत. मात्र, चैतालीने पतीच्या या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपले संबंध टिकवून ठेवले. या कारणावरून दाम्पत्यामध्ये तणाव वाढत गेला. अखेर या सततच्या वादांना कंटाळून चैतालीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला. रात्रीच्या सुमारास दोघांनी एकत्र येऊन नकुल यांचा कपड्याने गळा आवळून खून केला.

सिद्धार्थ आणि चैताली दोघांच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या हत्येचं गूढ उकललं. सिद्धार्थ पवारला अटक करण्यात आली. पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि चैतालीने हत्या केल्यानंतर मृतदेहाबाबत दिशाभूल करणारे प्रयत्न केले होते. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे दोघांचं सत्य बाहेर आलं. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. नकुल भोईर यांचे सहकारी आणि मित्रमंडळींनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवू, अशी भूमिका घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!