ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री लाडक्या उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार? दामानियांचा सवाल !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले आहे. पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमीडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात जमीन खरेदी केली आहे. हा व्यवहार वादात सापडला आहे कारण, अंदाजे १,८०४ कोटी रुपये इतका बाजारभाव असलेली ४० एकर जमीन कंपनीने केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर आरोप केल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अंजली दमानिया यांनी ट्वीट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. यात त्यांनी, “पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या Amadea Holdings LLP नावाच्या कंपनीने, १८०४ कोटीची महार वतनाची जमीन ३०० कोटीला घेतली? ह्या व्यवहारात २ दिवसात स्टँप ड्यूटी देखील माफ करण्याचे आदेश आले? अजित पवारांची ही केस एकनाथ खडसेंसारखीच नाही का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या लाडक्या उप मुख्यमंत्र्यांवर कारवाई करणार?” असे विचारले आहे.

पुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आणि महसूल मंत्र्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे, म्हणत महार वतनाची जमीन Bombay Inferior Village Watans Abolition Act, 1958, कलम 5(3) नुसार: अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही. म्हणजे कायद्याने…वतनाची जमीन सरकारची परवानगी न घेता विकता येत नाही, जर परवानगी न घेता विक्री झाली, तर ती बेकायदेशीर (illegal transfer) ठरते, अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे जाऊ शकते. मग महसूल मंत्री ही जमीन जप्तीचे आदेश कधी देणार? ही जमिन असलेल्या भागात आधीचे व्यवहार काय भावाने झाले ह्याचा तपशील द्यावा. स्टँप ड्यूटी न घेण्याचा निर्णय कोणी व कुठल्या अधिकाराने घेतला?

ह्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे

“हा व्यवहार १० कोटीच्या वरचा असल्याने EOW आणि ED ने ह्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. १ लाख रुपये Paid Up Capital असलेल्या कंपनीत ३०० कोटी कसे आले ? Unsecured Loan होते की Bank Loan? Unsecured loan असेल तर कुठल्या डायरेक्टर ने दिले ? जर पार्थ पवारने दिले तर हे कुठून आले? आणि हे जर त्याने दिले असतील तर हा ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल,” अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली आहे.

तसेच शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार… पोराचे १८०४ कोटींचे डील आणि त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्यूटी होते, हे डील ३०० कोटीचे दाखवून, त्यावरचे २१ कोटी देखील माफ ! ही माफी फुकट नव्हती का?” असा सवाल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!