नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबतच्या वादग्रस्त प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी लागणाऱ्या वेळेबाबत विचारणा केली आणि अखेर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत तहकूब केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 व 22 जानेवारी रोजी सलग दोन दिवस घेण्याचे संकेत दिले आहेत.
आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान कोर्टाने ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांकडून “युक्तिवादासाठी किती वेळ लागेल?” अशी विचारणा केली. त्यावर ठाकरे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ देवदत्त कामत यांनी “2 तास पुरेसे” असल्याचे सांगितले, तर वकील डॉ. ए.एम. सिंघवी यांनी “3 तास लागतील” असे नमूद केले.
कोर्टाने सांगितले की, काही मुद्दे एकमेकांशी जुळणारे असल्याने सर्व याचिका एकत्रितपणे ऐकल्या जातील. शिवसेनेच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या केसेसवरही सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाला 3 तास आणि शिंदे गटाला 2 तास युक्तिवादासाठी वेळ देण्यात येईल. यासाठी दोन्ही पक्षांना युक्तिवादाचे संकलन करण्यासाठी एक नोडल वकील नेमण्याची मुभा देण्यात आली आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 21 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता सुरू होईल आणि पुढील दिवशी म्हणजे 22 जानेवारीलाही चालू राहील. या सुनावणीवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्याचे चित्र स्पष्ट होणार असल्याने राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.