---Advertisement---

इंदुरीकर महाराजांचा टीकाकारांना खुला चॅलेंज : “लग्न आणखी टोलेजंग करणार!”

By team
On: November 16, 2025 10:37 AM
Follow Us:
---Advertisement---

अहिल्यानगर : वृत्तसंस्था 

किर्तनाद्वारे समाजप्रबोधन करणारे लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिच्या शाही साखरपुडा सोहळ्यामुळे सध्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. साधे व कमी खर्चात लग्न करण्याचा सल्ला देणारे इंदुरीकर महाराज यांनी मुलीच्या साखरपुड्यासाठी मोठा खर्च केल्याने सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. साखरपुड्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीकेने उग्र रूप धारण केले होते.

या टीकेने संतप्त झालेल्या महाराजांनी काही दिवसांपूर्वी किर्तन सेवा बंद करण्याचे संकेत देत, “माझ्यापर्यंत टीका ठीक, पण कुटुंबावर आली हे चुकीचे आहे. मला अक्कल आली पाहिजे, म्हणून फेटा खाली ठेवण्याचा विचार करतो,” असे वक्तव्य केले होते. मात्र आता समोर आलेल्या त्यांच्या नव्या व्हिडिओमध्ये त्यांनी टीकाकारांना थेट खुला चॅलेंज दिले आहे.

एका कीर्तनातील आपल्या भाषणात इंदुरीकर महाराज म्हणतात, “या औलादी माझ्या मुळावर उठणार हे माहित होतं. पण आता मीच चॅलेंज देतो—यापेक्षा देखील लग्न टोलेजंग करणार आहे. होऊ द्या काय ते! इकडं कोणी काय खाल्लं नाही? यांची काय टाप आहे?” यावेळी त्यांनी राजकीय खर्चावरही टीका करत, “तीस मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटी खर्च होतात, त्यावर कुणी बोलत नाही. पुढील महिन्यात गावागावात तमाशे लागतील, त्याबद्दल विचारा. ही विकलेली माणसं आहेत,” अशी टीका केली.

ज्ञानेश्वरी इंदुरीकर हिचा साखरपुडा संगमनेरमध्ये भव्य थाटात पार पडला. अंदाजे २,००० लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते. गाड्यांच्या मोठ्या ताफ्यासह, डोळ्यांवर गॉगल लावून ज्ञानेश्वरीने प्रवेश केल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले.

लोकांना साध्या पद्धतीने लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या महाराजांच्या मुलीच्या या शाही सोहळ्यावरून उठलेल्या टीकेनंतर आता महाराजांनी स्वतः स्पष्टीकरण देत, पुढील लग्नसोहळा याहूनही भव्य करण्याचा इशाराच दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!