ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समर्थनगरच्या नागरिकांना मिळणार ५० टक्के कर सवलत : थकबाकीमुळे घेतला ग्रामपंचायतीने निर्णय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट शहरा लगत असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोहिमेतून महत्त्वाची सवलत जाहीर करण्यात आली आहे. सन २०२४–२५ अखेर ज्यांची कर थकबाकी आहे, अशा धारकांना ३१ डिसेंबर पर्यंत एकरकमी भरणा केल्यास तब्बल ५० टक्के कर सूट देण्यात येणार आहे.

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, समर्थनगरमध्ये मालमत्ता करविषयक एकूण थकबाकी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रकमेच्या वसुलीसाठी ही योजना निर्णायक ठरणार आहे. परिसराची साधारण लोकसंख्या १० हजारांपेक्षा जास्त आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे व सहकार्यामुळे समर्थनगरला मोठा निधी मिळाल्याचे सांगण्यात आले. या निधीमुळे पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वास गेले असून नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

नवीन नळ कनेक्शनसाठी डिपॉझिट, एक वर्षाची पाणीपट्टी आणि कनेक्शन खर्च मिळून ७ हजाराची रक्कम आकारली गेली आहे.
अनेक नागरिक आर्थिक अडचणीमुळे कनेक्शन घेण्यास टाळाटाळ करीत होते.  मात्र आता सवलतीच्या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या समर्थनगरमध्ये सुमारे १ हजार ५०० मालमत्ता धारक असून पाणी कनेक्शनची मागणीही वाढत आहे. नवीन पाणी कनेक्शनसाठी ७ हजार रुपये डिपॉझिट, त्यासोबत एक वर्षाची पाणीपट्टी आणि १ हजार रुपये कनेक्शन खर्च अशी संरचना ठरविण्यात आली आहे. अद्यापपर्यंत केवळ ४० नागरिकांनी नवीन पाणी कनेक्शन घेतले असल्याची माहिती देण्यात आली.

कर सवलतीमुळे थकबाकीदारांना आर्थिक सुट मिळणार असून ग्रामपंचायतीच्या महसूल वाढीसही मदत होणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या उभारणीत गती येणार असल्याचेही माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी सांगितले. या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य नागरिकांना होणार असल्याने एकरकमी कर भरण्यासाठी ही सुवर्णसंधी गमावू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या या सवलतीचा लाभ घेत आपली थकबाकी तत्काळ भरून सहकार्य देण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!