---Advertisement---

अजित पवारांचा अकोटमध्ये मोठा खुलासा; ‘भिकारपणा’ शब्दाबाबत जाहीर माफी, गुत्तेदारांना कडक इशारा !

By team
On: November 26, 2025 3:20 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये घेतलेल्या सभेत महत्त्वपूर्ण विधान केले. अंबाजोगाई येथील सभेत जीभ घसरून वापरलेल्या ‘भिकारपणा’ या शब्दामुळे निर्माण झालेल्या वादावर त्यांनी सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

सभेत बोलताना पवार म्हणाले, “एखादा शब्द चुकीचा निघू शकतो, पण त्या शब्दाने भावना दुखावल्या असतील तर माफी मागणे माझे कर्तव्य आहे.” त्यांनी स्पष्ट केले की अंबाजोगाईतील अस्वच्छतेवर टीका करताना चुकीचा शब्द वापरला गेला. “तो शब्द माझ्याकडून निघायला नको होता. ती माझी चूक होती,” असे म्हणत त्यांनी जाहीर माफी मागितली. त्यांच्या या आत्मपरीक्षणाचे सभेत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

अजित पवारांनी आपल्या कामकाजाच्या शैलीवर भाष्य करत, “लोक म्हणतात मी कडक बोलतो; पण मी कडक नाही, कामसू आहे. सकाळी सहापासून मी कामात झोकून देतो. टीव्हीवरील टीआरपी नव्हे, तर जनतेचा विकास हीच माझी प्राथमिकता,” असा टोला विरोधकांना लगावला. “कामगिरी हीच माझी भाषा,” असेही त्यांनी अधोरेखित केले.

यानंतर भ्रष्टाचार आणि गुत्तेदारीवर त्यांनी थेट हल्ला चढवत, “राजकारण पारदर्शकपणे करा. गुत्तेदारी करायची असेल तर राजकारणात येऊच नका,” अशी चेतावणी दिली. नगराध्यक्षांच्या घरातील व्यक्तीच ठेके घेत असल्याने विकासकामांचा दर्जा घसरत असल्याची टीकाही त्यांनी नाव न घेता केली. “जनतेच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना आम्ही उघडे पाडू,” असा इशाराही त्यांनी दिला.

अकोटमधील सभेला कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वादावर दिलगिरी व्यक्त करतानाच विकासाचे दावे आणि विरोधकांवर निशाणा साधत पवारांनी आपली राजकीय प्रतिमा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र उमटले. आगामी नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मतदार कोणावर विश्वास ठेवतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!