अक्कलकोट शहराचे भाग्य उजळायचं असेल तर भाजपच्या हाती सत्ता द्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव असतो. संविधानाने लोकशाही दिली आहे, प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. उद्योगपती टाटा, बिर्ला, अदानींना एक आणि आपल्याला एक असं नाही, त्यामुळे आपल्या शहराचं भाग्य उजळवायचं असेल तर भाजपच्या हाती सत्ता देणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याणशेट्टी, दुधनीचे अतुल मेळकुंदे, मैंदर्गीचे अंजली बाजारमठ व सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढच्या पाच वर्षात शहर कोणाच्या ताब्यात द्यायचं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. भारत छोट्या छोट्या गावांनी जोडलेला आहे. पूर्वी ग्रामीण भागाकडे लक्ष द्यावे असे सांगितले जात होते, पण शहरांमध्ये सुद्धा लोक राहतात, त्यांनाही अन्न-वस्त्र- निवारा आवश्यक आहे.ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडल्याने अनेक लोक शहरात स्थलांतरित झाले, शहरं वाढली, अतिक्रमण वाढले, अनेक समस्या निर्माण झाल्या, जलस्त्रोत प्रदूषित झाले. अशा परिस्थितीत सरकारच्या माध्यमातून निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची योजना सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मंगरुळे हायस्कूल पटांगणात अक्कलकोटकरांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. यावेळी अक्कलकोटकरांच्या वतीने शहरात भव्य स्वागत केले.
या जाहीर प्रचार सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या काही वर्षांत अक्कलकोट तालुक्यात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि नागरिकांच्या सोयी-सुविधा या महत्त्वाच्या विषयांवर भाजपा-महायुती सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख केला. तसेच, तिन्ही शहरांच्या विकासासाठी आगामी काळात निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, अशी स्पष्ट आणि ठाम ग्वाही त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली. व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी, माजी आमदार राजन पाटील, जिल्हा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, शहाजी पवार, अमोलराजे भोसले, उपसभापती सुनील कळके, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष महेश बिराजदार, दिलीप सिद्धे, यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, महेश इंगळे, अविनाश मडीखांबे, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पाटील, नन्नू कोरबू, सद्दाम शेरीकर, उत्तम गायकवाड, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, आनंद तानवडे, चंद्रकांत स्वामी, प्रभाकर मजगे, मल्लिनाथ स्वामी, अप्पू परमशेट्टी, मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील, मंडळ अध्यक्ष अमोल हिप्परगी, अप्पू बिराजदार, अण्णाराव बाराचारी, मंडळ अध्यक्ष महादेव पाटील तसेच तीनही नगरपरिषदेचे नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या शहरांचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी महायुतीची उमेदवारच योग्य व सक्षम पर्याय असल्याचे नमूद करत, सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, स्थानिक पदाधिकारी आणि भावी नगरपरिषद एकजुटीने काम करण्यास कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.