ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ग्रंथ प्रकाशनात मंत्री नितीन गडकरींच्या आठवणींना उजाळा !

नागपूर : वृत्तसंस्था

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त नागपूर येथील विधान भवनात आयोजित ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. १३) उपस्थिती लावून उपस्थितांना संबोधित केले.

या वेळी आपल्या भाषणात गडकरी यांनी विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा दिला. “राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दरवर्षी अधिवेशन काळात अनेक विद्यार्थी येथे भेट देतात. मी दहावीच्या वर्गात असताना एक विद्यार्थी म्हणून येथे आलो होतो. आज पुन्हा याच सभागृहात एका संस्मरणीय कार्यक्रमासाठी निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला, याचा विशेष आनंद आहे,” असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या शंभर वर्षांचा वैशिष्ट्यपूर्ण आणि गौरवशाली इतिहास संकलित करून तो ग्रंथरूपाने आजच्या पिढीसह अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याबद्दल गडकरी यांनी समाधान व्यक्त करत या उपक्रमाचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, कार्यक्रमानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधत असताना आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने सुरू होती. यावेळी गडकरी यांनी संबंधित आमदारांना काही काळ थांबण्याची विनंती केल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!