ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा, आज भाजपमध्ये प्रवेश

मुंबई प्रतिनिधी : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्या आजच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्रज्ञा सातव काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे उघडपणे जाणवत होते. अखेर आज सकाळी त्यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने प्रज्ञा सातव यांचा हा निर्णय काँग्रेससाठी मोठा राजकीय झटका मानला जात आहे.

प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशासाठी हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर मुंबई गाठली असून, त्यांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून या प्रवेशाला विशेष महत्त्व दिले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद अधिकच चिघळले होते. विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी प्रज्ञा सातव यांचे नाव चर्चेत असतानाही त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप आहे. हिंगोलीचे तत्कालीन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी इतर उमेदवारांना पसंती दिल्याने प्रज्ञा सातव नाराज झाल्या होत्या. या मुद्द्यावरून पक्षांतर्गत मतभेद उफाळून आले होते.

या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडून ठोस प्रयत्न झाले नसल्याने पक्षातील गटबाजी अधिकच वाढली. अखेर समन्वयाच्या अभावामुळे आणि दुर्लक्षामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचा दावा सातव समर्थकांकडून केला जात आहे. प्रज्ञा सातव यांच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, भाजपला नवी ताकद मिळाल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!