ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘निगेटिव्ह मत नको, सकारात्मक विकास हवा’ – फलटणकरांना फडणवीसांचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकांत महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्थानिक राजकीय समीकरणांनुसार स्वतंत्रपणे लढत असल्याने प्रचाराच्या रणनितीत मोठा बदल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिसून येत आहे. मित्रपक्षच थेट आमने-सामने असल्याने टीका टाळत सकारात्मक विकासाच्या मुद्द्यांवर मत मागण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली असून, साताऱ्यातील फलटण येथे झालेल्या जाहीर सभेत त्याची स्पष्ट प्रचिती आली.

फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत असून येथे शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी थेट लढत आहे. गुरुवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटणच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करताना हे शहर छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम यांच्या इतिहासाशी जोडलेले असल्याचे सांगितले. अशा पवित्र आणि ऐतिहासिक शहरात मोठे व सकारात्मक परिवर्तन घडवणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मी कुणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही. मला निगेटिव्ह मत नको, तर विकासासाठी सकारात्मक मत हवे आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी प्रचाराचा सूर बदलल्याचे स्पष्ट केले. आमच्याकडे विकासाचा ठोस कार्यक्रम आहे. म्हणूनच आम्ही जनतेसमोर सकारात्मक अजेंडा मांडत आहोत, असे फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कार्याचा उल्लेख करत, त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून फलटणकरांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले असल्याचे सांगितले. आता त्यांना नगराध्यक्ष करण्याची सुवर्णसंधी मतदारांच्या हाती असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधक चिखलफेक करतील, मात्र कमळावर कोणत्याही चिखलाचा परिणाम होत नाही, कारण कमळ चिखलातच उमलते, असा राजकीय टोला त्यांनी लगावला. 20 तारखेला भाजप-राष्ट्रवादी युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करून फलटणला सातारा जिल्ह्यातील सर्वात आधुनिक शहर बनवण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या प्रकरणात सर्व तांत्रिक पुरावे उपलब्ध असून दोषींना कठोर शिक्षा होईल आणि पीडितेला न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, अशा संवेदनशील घटनेचे राजकारण करून कुणाला तरी लक्ष्य करणे योग्य नाही, असा सूचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!