ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सौर पॅनेल कंपनीत मृत्यूचे तांडव; टँक टॉवर कोसळून 3 ठार, 11 जखमी

नागपूर : वृत्तसंस्था

नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी (दि. १९) दुपारी एक भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. येथील ‘अवाडा’ या सौर पॅनेल निर्मिती करणाऱ्या कंपनीत पाण्याचा टँक टॉवर अचानक कोसळल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवाडा कंपनीत सौर पॅनेल निर्मिती आणि प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होते, त्याच परिसरात उभारण्यात आलेला पाण्याचा मोठा टँक टॉवर शुक्रवारी दुपारी अचानक कोसळला. त्या वेळी टॉवरच्या खालील भागात अनेक कामगार काम करत होते. अचानक कोसळलेल्या अजस्त्र टॉवरमुळे आणि पाण्याच्या प्रचंड दाबामुळे कामगारांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एमआयडीसी प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 11 कामगारांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सौर पॅनेल निर्मितीसारख्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पात आवश्यक सुरक्षा उपाययोजना पाळल्या गेल्या होत्या का, टॉवर नेमका कशामुळे कोसळला, तसेच बांधकामात काही तांत्रिक त्रुटी होत्या का, याबाबत पोलिस आणि प्रशासनाकडून सखोल तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे कंपनीतील कामगारांमध्ये भीतीचे व संतापाचे वातावरण असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!