---Advertisement---

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना हटवण्याची मागणी

By team
On: December 19, 2025 3:01 PM
Follow Us:
---Advertisement---

बीड प्रतिनिधी : बीड न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असून, या खटल्याला आता नवे वळण मिळाले आहे. सरकारी पक्षातर्फे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडल्यानंतर, वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा दावा करत, त्यांना या खटल्यातून बाजूला करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, सुरुवातीच्या दोन एफआयआरमध्ये विष्णू चाटेचे नाव नाही तसेच यापूर्वी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. मात्र, सरकारी पक्षाने विष्णू चाटेकडून वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचा दावा केला. तो सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात सक्रिय असल्याचेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

सुनावणीदरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. न्यायाधीशांनी अर्जाबाबत माहिती दिल्यानंतर, निकम यांनी हा अर्ज फेटाळण्याची मागणी करत आपली भूमिका स्पष्ट केली. याच वेळी, न्यायाधीशांनी आरोपी सुदर्शन घुले याचे नाव पुकारताच त्याला अचानक चक्कर येऊन तो न्यायालयात कोसळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

दुसरीकडे, पुराव्यांच्या तांत्रिक मुद्द्यांवरून आरोपींच्या वकिलांनी आक्रमक भूमिका घेतली. घटनेचे व्हिडिओ आधी आरोपींना देण्यात यावेत आणि त्यानंतरच आरोप निश्चिती करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘जे व्हिडिओ ट्रायल कोर्टात नाहीत, ते उच्च न्यायालयात दाखवून वातावरण भावनिक केले जाते,’ असा आक्षेपही यावेळी नोंदवण्यात आला. यावर सरकारी पक्षाने संबंधित व्हिडिओ फाईल्स आजच आरोपींच्या वकिलांना देण्याचे मान्य केले.

दरम्यान, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधील डेटाबाबत झालेल्या सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेत, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी करून मूळ डेटा डिलिट केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. या सर्व घडामोडींमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात अद्याप आरोप निश्चिती होऊ शकलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!