अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सक्षम नेतृत्व बँकेत यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केले.
जिल्हा बँकेच्या सन २०२६-२०३१ संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॅनलच्या प्रचारार्थ अक्कलकोट येथील शिवसेना भवनात विचारविनिमय बैठक पार पडली. यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. पॅनलचे उमेदवार अमोल शिंदे, अनिकेत देशमुख आणि अस्मिता गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, मल्लिकार्जुन पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनीही सहकार क्षेत्राच्या वाटचालीवर भाष्य करताना शेतकऱ्यांचे हित हाच सहकाराचा ध्यास
असून जिल्हा बँकेच्या प्रगतीसाठी नवा प्रवास आवश्यक आहे. सक्षम नेतृत्वातून सहकाराला योग्य दिशा मिळावी, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. अनिकेत देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. अक्कलकोटमधील सहकार क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सूत्रसंचालन मोहसीन मोकाशी यांनी केले, तर श्रीशैल रब्बा यांनी आभार मानले.








