अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : समर्थनगर येथील अनेक दिवसांपासून बंद असलेले आरोग्य उपकेंद्र लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या उपकेंद्राची जिल्हा परिषद सदस्य विकास बुळळा आणि भाजप मंडल अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी स्थानिक पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी उपकेंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर ती आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे हे केंद्र अद्याप सुरू झाले नव्हते. आता उद्यापासून इमारत आणि परिसराच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात येणार असून, आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले आहे.
या पाहणीवेळी माजी उपसरपंच लालसिंग राठोड, निखिल सलगोंडा, उदय नरेगल, बसवराज मटगी, विनोद राठोड, सूर्यकांत कळके, निलेश बिराजदार, संदीप सुतार, रोहित सुतार, ग्रामविकास अधिकारी दयानंद खोबण, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
उपकेंद्र सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना छोट्या-मोठ्या आजारांवरील उपचार, लसीकरण आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होणार आहे. स्थानिक पातळीवरच आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी सांगितले.









