अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ध्यान अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय विनामूल्य पौर्णिमा मौन ध्यान शिबिराची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी मैंदर्गी रोडवरील भोसले मंगल कार्यालयात पहाटे
५ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.
निसर्गाचा समतोल, जलसमृद्धी आणि सर्व जीवांच्या कल्याणाचा व्यापक संदेश या शिबिरातून दिला जाणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले,विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले, अण्णू महाराज पुजारी, अवनी राव, चंद्रशेखर रेड्डी, नगरसेवक प्रथमेश कोठे, पूर्णचंद्र राव, अविनाश मडीखांबे,संतोष पराणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिबिरामध्ये लाईव्ह संगीत ध्यान, सामुदायिक नृत्य, ज्ञान व ध्यान, अनुभव आदानप्रदान, ताली योग, ईएफटी तसेच प्रश्नोत्तरे व चर्चेची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सहभागींसाठी अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ध्यानाच्या माध्यमातून मानसिक शांतता, आत्मचिंतन आणि सकारात्मकतेचा अनुभव घेण्याची संधी या शिबिरातून मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्विमिंग ग्रुप, अक्कलकोट यांच्या वतीने करण्यात आले आहे.









