सोलापूर, प्रतिनिधी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. प्रचारादरम्यान माजी आमदार राजन पाटील यांनी बँकेतील मोठ्या कर्जप्रकरणांवरून तत्कालीन कारभारावर निशाणा साधला. २०० ते २५० कोटी रुपयांची प्रकरणे मंजूर झाल्यानंतरही त्याची माहिती लोकप्रतिनिधींना सहा महिन्यांनी मिळत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
राजन पाटील म्हणाले, डीसीसी बँकेत २०० ते २५० कोटी रुपयांची प्रकरणे मंजूर झाली होती. त्यावेळी आम्ही आमदार होतो. मात्र, एवढ्या मोठ्या रकमेची प्रकरणे मंजूर झाल्याची माहिती आम्हाला तब्बल सहा महिन्यांनंतर मिळायची. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभारातील पारदर्शकता आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांबाबतचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
डीसीसी बँकेच्या निवडणुकीत मागील कारभार, कर्जवाटप आणि आर्थिक व्यवहारांवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजन पाटील यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात बँकेच्या कारभाराचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.











