अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक कल्पकतेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. नागनहळळी येथील के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘स्मार्ट अॅग्रिकल्चरल इक्विपमेंट’ या नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पाची ५३व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनासाठी (RBVP–2026) निवड झाली आहे. एनसीईआरटी, नवी दिल्ली यांच्या अधिकृत पत्राद्वारे ही निवड जाहीर झाली असून, या यशामुळे अक्कलकोट तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक वाढला आहे.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील ओंकार सुरेश फडतरे आणि महेश श्रीमंत टेंगळे या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प विकसित केला आहे. त्यांना प्रा. रविंद्र नवले यांचे मार्गदर्शन, तर प्रयोगशाळा सहाय्यक नुरुद्दीन रशीद शेख यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय निवड प्रक्रियेत यश मिळवल्यानंतर या प्रकल्पाने आता राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे.
देशातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे हे विज्ञान प्रदर्शन १४ ते १९ डिसेंबर २०२६ या कालावधीत पुदुच्चेरी येथे आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या ९७७ आश्रमशाळांमधून राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळवणारी नागनहळळी आश्रमशाळा पहिली ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य आय. एम. मुजावर आणि संस्थेचे सचिव जावेद पटेल यांनी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेला राष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याने अक्कलकोट तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.










