अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कुरनूर येथील ग्रामदैवत हजरत पीर सातू सय्यद बाबांच्या यात्रेला गुरुवार, दि. २६ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेनिमित्त गावात तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवारी (२६ नोव्हेंबर) गंध कार्यक्रमाने यात्रेची सुरुवात होईल. शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) नैवेद्य व दंडवत विधी पार पडतील. तर शनिवारी (२८ नोव्हेंबर) पारंपरिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून रात्री सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी विविध युवा मंचच्या वतीने लावणी, ऑर्केस्ट्रासह मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
या यात्रेत हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित सहभागी होऊन श्रद्धेने उत्सव साजरा करतात. त्यामुळे यात्रेला धार्मिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेची परंपरा लाभली आहे. यंदा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन होते. मात्र, परिसरातील दुष्काळी परिस्थिती आणि कुरनूर धरणातील घटलेला पाणीसाठा यामुळे उत्सवावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. परिणामी, यात्रेतील व्यावसायिक उलाढालही मंदावण्याचा अंदाज आहे. भाविकांनी यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा पंच कमिटीच्या वतीने
करण्यात आले आहे.









