---Advertisement---

दुष्काळ दूर होऊ दे, बळीराजा सुखी होऊ दे! विठ्ठलाला शिंदेंचे साकडे

Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर, (प्रतिनिधी) : राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून, त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त शनिवारी (दि. २१) श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून निवड झालेल्या नांदेड जिल्ह्यातील सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता शिंदे उपस्थित होते. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले आहे. सर्वसामान्य वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन सुलभतेने आणि कमी वेळेत मिळावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाला असून, भाविकांना लवकर दर्शन घेता येत आहे.

यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला होता. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. कार्तिकी यात्रेत वारकऱ्यांना उत्तम सुविधा दिल्याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि मंदिर समितीचे त्यांनी कौतुक केले.

राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप आणि रब्बी हंगामात पाऊस अत्यल्प झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. या परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन परिस्थितीची विचारपूस करत आहेत. दिवाळीच्या काळात आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले असून, दुष्काळी परिस्थितीत लागू होणाऱ्या विविध सवलतीही जाहीर करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. आवश्यक सोयीसुविधांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी पर्यटन विभागामार्फत अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यात्रेच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार सचिन लंगुटे आणि मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सुधाकर शिंदे दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याचा मान

कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे (वय ५८) आणि त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे (वय ५१) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली.

शिंदे दाम्पत्य गेल्या ११ वर्षांपासून नियमितपणे वारी करत असून, गेल्या २५ वर्षांपासून माळकरी आहे. शेती व्यवसाय सांभाळत त्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपली आहे. श्री. सागर महाराज वाशिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे दाम्पत्य वारकरी संप्रदायाशी जोडले गेले.

महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाच्या वतीने वर्षभर मोफत प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी २०२७’चे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले, तर आभार कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मानले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!