सांगली वृत्तसंस्था : राज्यात सुरू असलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांच्या निकालात महायुतीने दणदणीत यश मिळवत महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात महायुतीचा वरचष्मा स्पष्ट दिसत असून, सांगली जिल्ह्यातील जत नगर परिषदेत झालेल्या निकालाने राजकीय वर्तुळात विशेष लक्ष वेधले आहे.
सांगलीच्या जत नगर परिषदेत यंदा काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, भाजपाने सत्तांतर घडवत नगर परिषद आपल्या ताब्यात घेतली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने येथे घवघवीत यश संपादन केले आहे. काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत भाजपाने नगराध्यक्ष पदासह दहा जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाचे रवींद्र आरळी हे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
जत नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) अशी चौरंगी लढत पाहायला मिळाली. २४ जागांच्या नगर परिषदेत भाजपाला १०, काँग्रेसला ९, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३ तर अपक्षांना १ जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाला येथे खातेही उघडता आलेले नाही. या निकालामुळे जत नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली असून, भाजपाच्या नेतृत्वाखाली नवे सत्तांतर घडून आले आहे.
दरम्यान, राज्यभरातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीच्या तब्बल २१४ नगराध्यक्ष पदांवर विजय झाला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ ५० जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला ३२ जागा मिळाल्या असून, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला प्रत्येकी केवळ ९ नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवता आला आहे.
या निकालांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, आगामी राजकीय समीकरणांवरही या निकालांचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.