ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हा विजय 2017 च्या निवडणुकांपेक्षाही मोठा – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज पार पडली असून, निकालांनी राज्याच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व स्पष्ट केले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीचे तब्बल 213 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्षांसह भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यात भाजपाचे 129 नगराध्यक्ष विजयी झाले असून तीन हजारांहून अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. हा विजय 2017 च्या निवडणुकांपेक्षाही मोठा असून, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. महायुतीतील तिन्ही पक्षांचे मिळून सुमारे 75 टक्के नगराध्यक्ष निवडून आल्याने जनतेने विकासाच्या अजेंड्याला स्पष्ट पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवकांच्या बाबतीत भाजपने नवा विक्रम केल्याकडे लक्ष वेधताना फडणवीस म्हणाले की, 2017 मध्ये भाजपचे 1602 नगरसेवक होते, तर यावेळी ही संख्या थेट 3302 वर पोहोचली आहे. प्रचारादरम्यान आपण संपूर्णपणे सकारात्मक भूमिका घेत विकासावर मत मागितले आणि भविष्यातील विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर मांडली. जनतेने आमच्या विकासकामांवर शिक्कामोर्तब केल्याचे हे निकाल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय नेतृत्वाने दिलेली जबाबदारी राज्यातील सर्व नेत्यांनी आणि मंत्र्यांनी समर्थपणे पार पाडली असल्याचे सांगत, हा विजय सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे फडणवीस म्हणाले. जनतेने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि विकासाचा वेग कायम ठेवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!