ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री प्रवास सोपा नव्हता; एकनाथ शिंदेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : वृत्तसंस्था

मुंबईच्या दादर येथे शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा खोचक टीका केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “सत्य परेशान हो सकता है, पण सत्य पराजित होऊ शकत नाही. सच्चा जिता, हार गया झुठा. जनतेने उबाठाला जमालगोटा दिला आहे,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी काहींना ते सहन होत नाही. अडीच वर्षे पायाला भिंगरी लावून मी काम केले. त्या काळात अडीच तासही नीट झोपलो नसेन. लोक विचारायचे तुम्ही कधी झोपता? मी म्हणायचो, मी झोपायला नाही, लोकांची झोप उडवायला आलो आहे.”

आपल्या राजकीय प्रवासाबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री असतानाही मी स्वतःला कार्यकर्ताच मानत होतो आणि आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. “शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास सोपा नाही. कार्यकर्त्यांच्या कष्टामुळेच आमदार, खासदार आणि मंत्री घडतात. या व्यासपीठाची खरी शोभा कार्यकर्तेच आहेत,” असे म्हणत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “फेसबुक लाईव्ह करून पक्ष वाढत नाही. घरात बसून शिवसेना वाढत नाही. मी फिरत असताना मला महाविकास आघाडी कुठेच दिसली नाही. त्यांनी आधीच पराभव मान्य केला होता.” कोण खरी आणि कोण नकली शिवसेना आहे, हे जनतेने दाखवून दिल्याचा दावाही त्यांनी केला.

शिंदे पुढे म्हणाले की, सरकारने अनेक विकास योजना सुरू केल्या असून काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहिली आहे. “महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांची मते एकत्र केली तरी एकट्या शिवसेनेपेक्षा ती कमी आहेत. हा विजय ऐतिहासिक आहे,” असा दावा त्यांनी केला. शेवटी बोलताना एकनाथ शिंदे यांनी, “शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांची आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांत महायुती पुन्हा एकदा भगवा फडकवेल,” असा विश्वास व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!