मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, या घडामोडीमुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, विशेषतः मुंबई महापालिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने मुंबईसह प्रमुख महापालिकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असतानाच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. मराठी मतदारांवर प्रभाव टाकणारी ही युती निवडणूक राजकारणात निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.
संजय राऊत यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमुळे युतीची औपचारिक घोषणा जवळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी केवळ “उद्या १२ वाजता” असे तीन शब्द लिहून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ठाकरे बंधूंच्या हातात गुलाबांच्या फुलांचा मोठा गुच्छ दिसत असून, हा फोटो राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ही घोषणा एखाद्या हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नव्हता, तर उद्धव ठाकरे यांनीच त्यांना बाहेर पडायला भाग पाडले. आता उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांची गरज भासत असल्याने ते त्यांच्या दारी गेले आहेत. कोविड काळात घराबाहेर न पडणारे नेते आता मराठी माणसाची आठवण काढत आहेत. हे कितीही एकत्र आले तरी त्यांचा आकडा ३५-४० च्या पुढे जाणार नाही.”
उद्या होणाऱ्या या घोषणेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, ठाकरे बंधूंची ही युती मुंबई महापालिका निवडणुकीत कोणते नवे राजकीय वळण देणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.