नाशिक वृत्तसंस्था : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांनंतर आता राज्याचे लक्ष महापालिका निवडणुकांकडे लागले आहे. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी, पुणे, नागपूर आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून पक्षांतरांचे सत्र सुरू झाले आहे.
विशेषतः महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याचा कल वाढलेला दिसत आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांत महायुतीने घवघवीत यश मिळवल्याने अनेक नेते व कार्यकर्ते सत्ताधारी गटाकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी पक्षाच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेविका आशा तडवी यांनीही राजीनामा सादर केला आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यास मुभा दिली जात नसल्याने नाराजी असल्याचे आशा तडवी यांनी स्पष्ट केले.
राजीनाम्यानंतर बोलताना राहुल दिवे म्हणाले, “महापालिका निवडणुकांसाठी मनसेसह इतर पक्षांशी आघाडी करण्याची आमची इच्छा होती. मात्र पक्षाने परवानगी नाकारली. आघाडी न झाल्यास नुकसान होईल, ही भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडली होती.” पुढे त्यांनी सूचक विधान करत “भाजप किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेत जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आज संध्याकाळी बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर करू,” असे सांगितले.
दरम्यान, केडीएमसी महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सक्रिय झाली असून महापालिका आयुक्तांकडे अधिकृत ‘ए’ फॉर्म दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत ७५ अर्ज प्राप्त झाले असून ३० ते ३५ इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असून २६ तारखेपर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
तसेच ठाणे महानगरपालिकेचे वारेही जोरात वाहू लागले आहेत. ठाण्यातील टेंभी नाका व आनंद आश्रम परिसरात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. खासदार नरेश मस्के, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शहरप्रमुख हेमंत पवार यांच्यासह वरिष्ठ नेते उमेदवारांची चाचपणी करत आहेत.