१७ लाखांच्या लाचप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात
५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक; घरातून १८.३० लाख रोख जप्त
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील सीजीएसटी (केंद्रीय वस्तू व सेवा कर) कार्यालयातील एका अधीक्षकाला खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तब्बल १७ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने ही कारवाई केली.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, २६ नोव्हेंबर रोजी आरोपी अधीक्षकाने तक्रारदाराच्या कंपनीचे ऑडिट केले होते. यावेळी कंपनीने ९८ लाख रुपयांचा कर बुडविल्याची खोटी धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी सुरुवातीला २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. नंतर तडजोडीनंतर ही रक्कम १७ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली. त्यापैकी २२ डिसेंबर रोजी ५ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले होते.
दरम्यान, तक्रारदाराने २२ डिसेंबर २०२५ रोजी सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत सीबीआयने तात्काळ सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन पोहोचताच सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधीक्षकाला रंगेहाथ पकडले.
अटकेनंतर सीबीआयने आरोपीच्या मुंबईतील निवासस्थानी झडती घेतली. या कारवाईत १८ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून या रकमेचा समाधानकारक हिशोब आरोपी देऊ शकला नाही. तसेच एप्रिल २०२५ मध्ये ४०.३० लाख रुपये आणि जून २०२४ मध्ये ३२.१० लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपीच्या कार्यालयातून डिजिटल पुरावे तसेच ऑडिट अहवालाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
राज्यात एसीबीकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असतानाच, सीबीआयने केंद्रीय विभागातील अधिकाऱ्यावर केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू आहे.