जयपूर वृत्तसंस्था : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने विजय हजारे ट्रॉफी 2025- 26 स्पर्धेत अनेक वर्षांनंतर दणक्यात कमबॅक करत आपली क्लास पुन्हा सिद्ध केली आहे. मुंबईकडून खेळताना सिक्कीमविरुद्ध रोहितने अवघ्या 62 चेंडूत झंझावाती शतक ठोकत क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले.
जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात रोहितने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. प्रत्येक गोलंदाजावर विश्वासाने फटकेबाजी करत त्याने मैदानाच्या चारही बाजूंना फटके लगावले. रोहितची खेळी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र सामना लाईव्ह प्रक्षेपित न झाल्याने अनेक चाहत्यांना निराशा सहन करावी लागली.
सलामीला आलेल्या रोहित आणि अंगक्रिष रघुवंशी यांनी मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने 118 चेंडूत 141 धावांची शतकी भागीदारी रचली. अंगक्रिष 58 चेंडूत 38 धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या डेब्यूटंट मुशीर खानसमोरच रोहितने आपले शतक पूर्ण केले.
रोहितने या खेळीत 8 षटकार आणि 8 चौकार ठोकत 162 च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावले. लिस्ट ‘ए’ क्रिकेटमधील हे रोहितचे 37 वे शतक ठरले. त्याच्या या आक्रमक खेळीने मुंबईचा विजयाचा मार्ग सुकर झाला. दरम्यान, रोहित शर्माच्या या तडाखेबंद शतकामुळे न्यूझीलंड संघाची चिंता वाढली आहे. नववर्षात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. विजय हजारेतील रोहितचा फॉर्म पाहता चाहत्यांना न्यूझीलंडविरुद्धही ‘हिटमॅन’कडून अशाच स्फोटक खेळीची अपेक्षा आहे.